निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या मृत्यूनंतर हयातकालीन थकबाकीचे प्रदान अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / कोषागार कार्यालयामार्फत नामनिर्देशित व्यक्तीस / व्यक्तींना अथवा कायदेशीर वारसदारास प्रदान करण्याच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करणेबाबत........

निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या मृत्यूनंतर हयातकालीन थकबाकीचे प्रदान अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / कोषागार कार्यालयामार्फत नामनिर्देशित व्यक्तीस / व्यक्तींना अथवा कायदेशीर वारसदारास प्रदान करण्याच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करणेबाबत........


महाराष्ट्र शासनाने दि ७ एप्रिल २०२६ रोजी शासन निर्णय पारित करून निर्देश दिले आहेत कि....

प्रस्तावना :-

निवृत्तीवेतनधारकाच्या / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर निवृत्तीवेतनाच्या कुटुंबनिवृत्तीवेतनाच्या हयातकालीन थकबाकीचे प्रदान महाराष्ट्र कोषागार नियम पुस्तिका, १९६८ मधील ३५९(१) (ब) नुसार त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या वारसाला त्याच्या मृत्यूनंतर एक वर्षाच्या आत त्यांनी अर्ज सादर केल्यासच देण्याबाबतची तरतूद आहे.

मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्र. ७२ अन्वये निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर हयातकालीन थकबाकीचे प्रदान करणेसाठी वारसांकडून क्षतीपूर्ती बंधपत्र घेणे बंधनकारक आहे.महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम क्र. ३५९(अ ते ड) नुसार नामनिर्देशन देण्याबाबत तरतूद केलेली आहे. त्यानुसार एखाद्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाने मृत्यूपूर्वी नामनिर्देशन नमुना ४२-अ या नमुन्यामध्ये रितसर नामनिर्देशन केले नसल्यास अशा प्रकरणी वारसदारास न्यायालयाकडून वारसाहक्क प्रमाणपत्र (Succession Certificate) प्राप्त करुन घेऊन कोषागार कार्यालयास सादर करावे लागते.

वारसदारांना सदर नियमांबाबत माहिती नसल्यामुळे अर्ज विहित वेळेत सादर करण्यासाठी, क्षतीपूर्ती बंधपत्र, वारसाहक्क प्रमाणपत्र (Succession Certificate) प्राप्त करुन घेण्यासाठी कालापव्यय व आर्थिक बोजा वारसदारावर येतो. यामुळे महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नियम क्र. ३५९(१) (ब), मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्र. ७२ च्या तरतूदींमध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.


शासन निर्णय :-

१. महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नियम क्र. ३५९ (१) (ब) मधील १ वर्षाची अट शिथिल करण्यात येत असून ती ५ वर्षे करण्यात येत आहे. नामनिर्देशित वारसदाराने हयातकालीन थकबाकी मिळणेसाठी अर्ज अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / कोषागार कार्यालयास करणे आवश्यक आहे.

२. नामनिर्देशित वारसदाराने निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकापासून ५ वर्षांच्या आतमध्ये अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / कोषागार कार्यालयास अर्ज सादर केल्यास हयातकालीन थकबाकी रक्कम परिगणना करून अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / कोषागार कार्यालयांनी त्यांच्या स्तरावर रक्कम प्रदान करणेबाबत कार्यवाही करावी.

३. नामनिर्देशित वारसदाराने निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकापासून ५ वर्षांनंतर अर्ज सादर केल्यास अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / कोषागार कार्यालयाने अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकीची मागणी अमान्य करुन तसे संबंधित वारसदारास कळवावे.

४. महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम क्र. ३५९ (अ ते ड) नुसार नामनिर्देशन देण्याबाबत तरतूद केलेली आहे. त्यानुसार एखाद्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाने मृत्यूपूर्वी नामनिर्देशन नमुना ४२-अ या नमुन्यामध्ये रितसर नामनिर्देशन केले असल्यास अशा प्रकरणी निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीस मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्र. ७२ अन्वये क्षतीपूर्ती बंधपत्र भरून देण्याची आवश्यकता नाही. तसेच नामनिर्देशन नसलेल्या प्रकरणी वारस प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या वारसदारास / वारसदारांना क्षतीपूर्ती बंधपत्र भरून देण्याची आवश्यकता नाही.

५. निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनी कोषागार कार्यालयात नामनिर्देशन केलेले नसल्यास अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकी रक्कम रुपये एक लाखापेक्षा कमी असल्यास अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर खालील कागदपत्राच्या आधारे हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी.

अ) तहसीलदार यांच्याकडून प्राप्त झालेले वारस प्रमाणपत्र

ब) निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत, त्या कार्यालयाकडून कार्यालय प्रमुख / आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले कुटुंब तपशील प्रमाणपत्र

क) निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक हे हयात असताना केलेले नामनिर्देशन / मृत्यूपत्र (will) वारसदाराने उपलब्ध करुन दिल्यास त्याबाबत वारसदारांचे रक्कम मिळणेबाबत स्वयंघोषणा प्रतिज्ञा पत्र वरीलपैकी कोणत्याही एका प्रमाणप्रत्राच्या आधारे वारसदाराकडून बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, उपलब्ध असल्यास शिधापत्रिका (रेशनकार्ड) या कागदपत्रांची छायांकित प्रत प्राप्त करुन घेऊन हयातकालीन थकबाकी रक्कम संबंधित वारसदार यांना प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी.

६. हयातकालीन थकबाकी रक्कम रुपये एक लाखा पेक्षा जास्त असेल तसेच वारसदार यांच्याकडून मुददा क्रमांक ५ मधील प्रमाणपत्र नसल्यास अथवा हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करताना वारसदार यांच्यामध्ये वाद असतील अश्या प्रकरणी न्यायालयाकडून प्राप्त झालेले वारसाहक्क प्रमाणपत्राच्या (Succession Certificate) आधारे रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी.

७. महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम क्र. ३५९ (२) नुसार हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करताना निवृत्तिवेतनधारकाचा निवृत्तीवेतन प्रदान आदेशाचा भाग (Pensioner PPO Copy) वारसदाराकडे उपलब्ध असल्यास घ्यावा. संबंधित वारसदाराकडे निवृत्तीवेतन प्रदान आदेशाचा भाग (Pensioner PPO Copy) नसल्यास तसे संबंधित वारसदाराकडून लिखित स्वरुपात घेऊन रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी.

८. महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम क्र. ३५९ (३) नुसार कुटुंब निवृत्तीवेतन ज्यांना लागू आहे, अशी प्रकरणे वगळून निवृत्तीवेतन प्रदान आदेशाचा भाग (PPO Copy) आणि हयातकालीन थकबाकी रक्कम वारसदार यांना प्रदान केल्याबाबतच्या माहिती सहित निवृत्तीवेतन प्रदान आदेशाचा भाग (PPO Copy) अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / कोषागार कार्यालयाने संबंधित महालेखापाल कार्यालयास परत पाठवावा.

९. वरीलप्रमाणे करण्यात आलेल्या सुधारणा यापूर्वी वारसदारांनी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / कोषागार कार्यालयात अर्ज सादर केलेल्या अथवा सुरू असलेल्या प्रकरणीसुध्दा लागू राहतील.

१०. प्रस्तुत शासन निर्णयास अनुसरुन महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ व मुंबई वित्तीय नियम, १९५९ मध्ये समुचित सुधारणा यथावकाश करण्यात येतील.

प्रस्तुत शासन निर्णय, मा. महालेखापाल कार्यालय, मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. Pension Misc/Ch.३/UOR- ७०१३३७४५/८०१११३५७, दिनांक ०१ डिसेंबर, २०२५ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.



थोडक्यात 

1.  अर्ज करण्याची मुदत वाढवली.

  • आधी: मृत्यूनंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक

  • आता: ही मुदत 5 वर्षे करण्यात आली आहे.

2.  नामनिर्देशित व्यक्तीसाठी नियम

  • जर निवृत्तीवेतनधारकाने नामनिर्देशन केलेले असेल:

  • वारसदाराने 5 वर्षांच्या आत अर्ज केल्यास थकबाकी दिली जाईल
  • 5 वर्षांनंतर अर्ज केल्यास रक्कम मिळणार नाही.

3.  क्षतीपूर्ती बंधपत्र (Indemnity Bond) सवलत

  • जर नामनिर्देशन केलेले असेल → बंधपत्राची गरज नाही

  • जर नामनिर्देशन नसले पण वारस प्रमाणपत्र आहे → तरीही बंधपत्राची गरज नाही

4.  ₹1 लाखापर्यंत थकबाकी (नामनिर्देशन नसल्यास)

जर रक्कम ₹1 लाखापेक्षा कमी असेल, तर खालील कागदपत्रांवर पैसे दिले जातील:

  • तहसीलदाराकडून वारस प्रमाणपत्र

  • कार्यालयाकडून कुटुंब तपशील प्रमाणपत्र

  • बँक पासबुक, आधार, पॅन, रेशन कार्ड (छायाप्रत)

  • आवश्यक असल्यास स्वयंघोषणा

  •  कोर्टात जाण्याची गरज नाही

5.  ₹1 लाखापेक्षा जास्त रक्कम / वाद असल्यास

  • खालील परिस्थितीत Succession Certificate (न्यायालयाचे) आवश्यक:

  • रक्कम ₹1 लाखांपेक्षा जास्त
  • कागदपत्रे अपुरी
  • वारसांमध्ये वाद

6.  PPO (Pension Order) बाबत

  • PPO copy असल्यास घ्यावी

  • नसल्यास वारसाकडून लेखी निवेदन घ्यावे

7.  जुनी प्रकरणेही लागू

  • हा निर्णय जुने आणि चालू प्रकरणांनाही लागू आहे

 फायदा 

  •  अर्ज करण्यासाठी जास्त वेळ (1 वर्ष → 5 वर्षे)
  •  कागदपत्रांची प्रक्रिया सोपी
  •  अनेक प्रकरणांत कोर्टाची गरज नाही
  •  आर्थिक व वेळेचा ताण कमी

शासकीय सोयी/सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे.


राज्यातील विद्याथ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजनाबाबत


 शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.


राज्यातील शाळांमध्ये चित्रपट / लघुपट / नाटक / अनुषंगिक ई-शैक्षणिक साहित्य दाखविण्याबाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.