स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांत डी.एड. बी. एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांत डी.एड. बी. एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत.




शिक्षण आयुक्तालयाने दि 7 ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार

संदर्भिय शासन निर्णयान्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांत डी. एड., बी. एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सदर शासन निर्णयामध्ये अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. तथापि, उमेदवारांची निवडप्रक्रिया करण्यासाठी निवडीचे निकष कोणते विचारात घ्यावेत याबाबत क्षेत्रिय कार्यालयाकडून विचारणा होत आहे. सदर शासन निर्णयातील अ. क्र. ११ वर नमूद केल्यानुसार सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त (शिक्षण) यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात अशी तरतूद आहे.


यास्तव शासन निर्णय दि. २३/०९/२०२४ मधील अटी व शर्ती तसेच प्रचलित तरतुदींसह उमेदवारांची निवड करण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीशिवाय खालीलप्रमाणे अधिकच्या सूचना देणे आवश्यक आहे.

१. सदरची नियुक्तीप्रक्रिया सन २०२३ २४ च्या संचमान्यतेनुसार १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील दोन पैकी एक नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी. शाळेची पटसंख्या १० पेक्षा जास्त झाल्यास शासन निर्णय दि. २३/०९/२०२४ मधील मुद्दा क्रमांक १६ नुसार नियमित शिक्षक देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

२. सन २०२३ २४ च्या संचमान्यतेनुसार १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांत दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यांपैकी एका शिक्षकांचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करुन समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतरच अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा.

३. उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असावा.

४. संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास डी. एड. (इ. १ ली ते इ. ५ वी साठी) / बी. एड. (इ. ६ वी ते इ. ८ वी साठी) या अर्हतेमध्ये अधिक गुण असणा-या उमेदवाराचा विचार करण्यात यावा.

५. सदर अर्हतेत समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक / व्यावसायिक अर्हताधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे.

६. अधिकच्या अर्हता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे.

७. रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणा-या उमेदवाराचा विचार करण्यात यावा, तसेच संबंधित तालुक्यातील देखील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार करण्यात यावा.

८. संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील / जिल्हयातील एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अ. क्र. ४ ते ६ वर नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा.

९. शासन निर्णय दि. २३/०९/२०२४ मधील अ. क्र. ७ वर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे महानगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित म.न.पा.च्या शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांच्याशी तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्याधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील.

१०. ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक ०५/१०/२०२४ मध्ये नमुद केल्यानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याबाबत निर्देश आहेत. निवड केलेल्या या उमेदवारांना शक्यतो १० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात यावी. निवड केलेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यास १० पटसंख्येपेक्षा अधिक शाळांमध्ये पदे रिक्त नसल्यास १० व त्यापेक्षा पटसंख्येच्या शाळांमध्ये पदस्थापना देता येईल.

वर नमूद केलेल्या अतिरिक्त सूचना, संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २३/०९/२०२४ व विविध शासन निर्णयांतील प्रचलित तरतूदी विचारात घेऊन १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील दोन शिक्षकांपैकी एका शिक्षक पदावर डी. एड., बी. एड. अर्हताधारक बेरोजगार पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.